जलद प्रतिसाद पथक
About Us
मुंबई शहर दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून संवेदनशील शहर आहे. दहशतवाद हल्ल्यांना त्वरीत प्रत्युत्तर देण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षित, तंदुरुस्त, कौशल्यनिपुण अशा ध्येयनिश्ठ अधिकारी व अंमलदार यांचा समावेश असलेल्या सुसज्ज पथकाची आवश्यकता होती.
दिनांक २६/११/२००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, दहशतवादी हल्ले आणि इतर प्रमुख सुरक्षा धोक्यांना प्रथम प्रतिसाद देणारे पथक म्हणून दिनांक ३१ ऑगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयान्वयेे एनएसजी आणि फोर्स वन दलांच्या धर्तीवर ‘जलद प्रतिसाद पथकाची’ स्थापना करण्यात आली.
जलद प्रतिसाद पथक हे दहशतवादी हल्ल्याच्या अनुशंगाने अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करते. तसेच घटनस्थळावरील सामरीक माहिती गोळा करुन संभाव्य दहशतवादी हल्ला निष्प्रभ करते आणि ओलिसांची सुटका करुन परिस्थिती नियंत्रणात आणतेे. तसेच अशा दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीनुसार एनएसजी आणि फोर्स वन दलांना अभियानादरम्यान सहाय्य करते.
जलद प्रतिसाद पथक हे मुंबई मधील या आधी दहशतवादी हल्ला झालेल्या व दहशतवादी हल्ला होण्याची संभावना असलेल्या संवेदनशील आस्थापनांचे वेळोवेळी रेकी, फॅमिलीरायझेशन व माॅकड्रिल करुन भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी कार्यसज्ज असते.
जलद प्रतिसाद पथकाची मुख्य जलद प्रतिसाद पथक व पाच प्रादेषिक विभाग अशा प्रकारे विभागणी करण्यात आली आहे. जलद प्रतिसाद पथकाचे मुख्यालय कलिना येथे असून अन्य पाच प्रादेशिक विभागातील पथके ही दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व आणि उत्तर अशा प्रादेशिक विभागाच्या नियंत्रण कक्षात तैनात करण्यात आली आहेत. जलद प्रतिसाद पथकावरील नियंत्रण हे मा. पोलीस सह आयुक्त (गुप्तवार्ता), मुंबई यांच्याकडे असून पर्यवेक्षण हे मा. अपर पोलीस आयुक्त (संरक्षण आणि सुरक्षा) यांच्याकडे आहे. जलद प्रतिसाद पथकात निवडलेले अधिकारी व अंमलदार हे एक संघटीत पथक म्हणून कार्य करतात व त्यांचे कामकाजावर पोलीस उप आयुक्त (जलद प्रतिसाद पथक) यांचेे घटक प्रमुख म्हणून प्रशासकीय नियंत्रण असते.
