गुन्हे शाखा

गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभागाची इमारत १९०८ मध्ये बांधण्यात आली, गुन्हे अन्वेषण विभाग १९०९ मध्ये कार्यरत झाले. पोलीस-प्रेस कक्ष त्याच्या डाव्या बाजूस कार्यरत करण्यात आले.

About Us


               सह पोलीस आयुक्त ( गुन्हे ) हे मुंबई शहरातील गुन्हे अन्वेषण, शोध आणि तपासणीचे प्रभारी आहेत. त्यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेत विविध शाखा कार्यरत आहेत. पोलीस उप आयुक्त त्या शाखांचे प्रमुख आहेत.

 

गुन्हे शाखेचा (सीआयडी) इतिहास : गुन्हे अन्वेषण विभाग

मुंबई पोलिसांनी ' स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय ' असे नाव कमावले आहे, हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उत्कृष्ट तपासामुळे आहे.

१८८४ च्या आधी योग्यरित्या व्यवस्थापित केलेला गुन्हे अन्वेषण विभाग नव्हता. त्या काळी सरकार गुन्हे अन्वेषणाकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या बाजूने नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की यामुळे आंतर-विभागीय हेवेदावे आणि बेबनाव निर्माण होईल.

मात्र, पोलिसांनी या अडथळ्यावर मात करत, नियमित श्रेणीचा भाग असलेली एक गुन्हे शोध शाखा सुरू केली.

१८९० साली, या गुन्हे शोध शाखेचे नाव बदलून गुन्हे अन्वेषण विभाग असे ठेवण्यास परवानगी देण्यात आली, तरीसुद्धा ती पोलीस दलाचाच एक भाग राहिली.

१९०८ मधील टिळक दंगलीत, पोलिसांच्या गुप्त माहिती संकलनातील त्रुटी स्पष्टपणे दिसून आल्या आणि त्यामुळे सरकारचा दृष्टिकोन बदलला.

यानंतर एस. एम. एडवर्डस यांनी ८ जून १९०९ रोजी गुन्हे अन्वेषण विभाग स्थापन केला. या विभागाने जुन्या डिटेक्टीव्ह शाखेची जागा घेतली आणि इंपीरियल पोलिसांच्या एका अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली एक अभिजात संस्था म्हणून कार्य सुरू केले.

या अधिकार्‍यास पोलीस उप आयुक्त हा दर्जा देण्यात आला — पहिले पोलीस उप आयुक्त एफ. ए. एम. एच. विन्सेंट हे होते, तर विद्यमान पोलीस उप आयुक्तांना विभागीय पोलिसांचे कामकाज पाहण्याची जबाबदारी देण्यात आली.

गुन्हे अन्वेषण विभागाने चार प्रमुख क्षेत्रांवर काम केले — राजकीय, विदेशी, गुन्हेगारी आणि संकीर्ण. प्रत्येक क्षेत्राचे प्रमुख एक पोलीस निरीक्षक होते.

संवेदनशील, राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये लक्ष देणे हे या विभागाचे मुख्य कार्य होते — आणि हे कार्य आजही सातत्याने सुरू आहे.