×

History


- १९७८

रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे

रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणेची स्थापना सन १९७८ साली झाली आहे. मुंबईतील संवेदनशिल पोलीस ठाण्यांपैकी एक अशी या पोलीस ठाण्याची गणना केली जाते. जुन्या पोलीस ठाणेची जागाही "लक्कीस्टार" ईमारत, जेरबाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई - १५ चे तळमजल्यावरील जागेत भाडेतत्वावर होती. पोलीस ठाणेच्या कामकाजासाठी सदरची जागा अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे पोलीस ठाणेस कामकाजाबाबत अनेक अडचणी भासत होत्या. पोलीस ठाणेस स्वतंत्र इमारतीची आवश्यकता असल्याने शिवशाही पुर्नवसन प्रकल्पांतर्गत राहूल नगर, रफि अहमद किडवाई मार्ग येथील नवीन इमारतीबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. त्यास मंजूरी मिळुन `सन २०११ साली पोलीस ठाणे हे शिवशाही पुर्नवसन प्रकल्पांतर्गत राहुल नगर, र.अ.कि. मार्ग येथील 'अे' विंग मधील तीन मजल्यावर स्थापन करण्यात आलेले आहे.

रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणेच्या पुर्वेस वडाळा व शिवडी पोलीस ठाणेची हद्द, पश्चिमेस भोईवाडा पोलीस ठाणेची हद्द, दक्षिणेस काळाचौकी पोलीस ठाणेची हद्द, तर उत्तरेस माटुंगा पोलीस ठाणेची हद्द आहे. तसेच या पोलीस ठाणेचे पुर्वेकडील बाजुस शिवडी व वडाळा ही दोन रेल्वे स्थानके आहेत. रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणेची विभागणी एकूण ४ नियतक्षेत्रात (बीटमध्ये) केलेली आहे.

रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे मुख्यालय, २ बस डेपो, वडाळा टेलीफोन एक्सचेंज, महागनर पालिकेची दोन पंपींग स्टेशन, २ रेल्वे स्टेशन, १ महानगर पालिका क्षय रूग्णालय, १९ बॅंका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा फुले तांत्रिक विद्यालय, त्याचप्रमाणे जकेरीया बंदर रोड, शिवडी येथे जलद गती दिवाणी व शहर सत्र न्यायालय इ. शासकीय व निम शासकीय महत्वाची कार्यालये आहेत.

पोलीस ठाणे हद्दीत रफि अहमद किडवाई मार्ग येथे हमरस्त्यावर हरी मस्जिद नावाची पोलीस ठाणे हद्दीतील मोठी मस्जिद असुन सदर ठिकाणी शुक्रवारच्या दिवशी तसेच मुस्लीम धर्मियांच्या महत्वाच्या सणांच्या दिवशी शिया-सुन्नी या दोन्ही पंथांचे साधारणत: चार ते पाच हजार मुस्लीम बांधव नमाज पठण करतात. तसेच कात्रक रोड, वडाळा या ठिकाणी पुरातन काळातील राम मंदिर असुन मंदिरा समोरच पुरातन "अलबेला हनुमान मंदिर" आहे. सदर दोन्ही मंदिरे प्रसिध्द असल्याने भाविक मोठया प्रमाणात श्रध्देने मंदिरांना भेटी देत असतात. त्याचप्रमाणे कात्रक रोडवरच माटुंगा पोलीस ठाणेच्या हद्दीत असलेले प्रति पंढरपुर म्हणुन ओळखले जाणारे विठ्ठल रखुमाई मंदिर असुन सदर मंदिराला देखील आषाढी एकादशी निमित्त संपुर्ण मुंबई व आजुबाजूच्या उपनगरातुन लाखो भाविक, वारकऱ्याच्या दिंडया, तसेच मान्यवर व अति महत्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी भेट देत असतात. पोलीस ठाणेच्या हद्दीत शिवसेना, कॉग्रेस (आय), राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना इत्यादी राजकीय पक्ष प्रामुख्याने कार्यरत आहेत. सदर पोलीस ठाणेच्या हद्दीत शिवडी क्रॉस रोड, जकेरीया बंदर रोड, गरीब नवाज चौक, शिवडी बी.डी.डी चाळ, महाजनी पथ, दगडी बिल्डींग, प्रबुध्द नगर, एस. प्रताप नगर, माधव नगर, विठ्ठल मंदिर वसाहत, कुरेशी नगर वडाळा गांव, या विभागात हिंदु - मुस्लीम अशी मिश्र वस्ती असुन राम टेकडी, गोपाळ बाग, टि. जे. रोड, शिवडी नाका, गोलंजी हिल रोड, ग. द. आंबेकर मार्ग ते भोईवाडा नाका, जे.वा. रोड ते महाजनी पथ, स्प्रिंग मिल कंम्पाउंड, सहकार नगर, जैन देरासर लेन ते र.अ.कि. मार्ग वडाळा स्टेशन रोड या विभागात हिंदु वस्ती असुन जकेरीया बंदर रोड, शिवडी क्रॉस रोड, प्रबुध्द नगर नॅशनल मार्केट, एस. प्रताप नगर या भागात प्रामुख्याने मुस्लीम समाज राहतात. तसेच भिमनगर, विठ्ल मंदिर वसाहत, अण्णाभाऊ साठे नगर, शिवडी बी.डी. डी. चाळ, महाजनी पथ या ठिकाणी प्रामुख्याने दलित वस्ती आहे. तसेच वडाळा गांव, कात्रक रोड, वडाळा स्टेशन रोड या विभागात ख्रिश्चन व इतर धर्मिय व उच्च मध्यम वर्गीय लोकवस्ती आहे. पोलीस ठाणे हद्दीत सुमारे ७५ टक्के समाज हा नोकर वर्ग असुन १५ टक्के हे फेरी, हमाली, तसेच पारंपारिक कुटीरोद्योग करून आपली उपजीविका चालवितात, तर १० टक्के व्यापारी वर्ग आहे. सन १९९२-९३ साली बाबरी मस्जिद पाडण्यावरून उमटलेल्या तीव्र पडसादामुळे तसेच पोलीस ठाणे हद्दीत हिंदु मुस्लीम अशी मिश्र वस्ती असल्यामुळे या पोलीस ठाणेच्या हद्दीत देखील जातीय दंगल उसळली होती.